ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाकरे गटाला धक्क्यांची मालिका; नेत्यांचा शिंदे व अजित पवार गटात प्रवेश

मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पक्षांतरांना वेग आला आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती अधिकृत झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाला सलग धक्के बसत असल्याचे चित्र आहे. तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले असले, तरी ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गळतीने उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे.

मुंबईतून मोठी राजकीय घडामोड समोर आली असून, शिवसेना ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांचे निकटवर्तीय राजू नाईक आणि दिनेश कुबल यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. कलीना वॉर्ड क्रमांक 89 चे स्टँडिंग नगरसेवक असलेले दिनेश कुबल यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गुरुवारी पक्षप्रवेश केला. याचवेळी राष्ट्रवादी शरद पवार गटातील रवींद्र घोसाळकर, राजू शेट्टी आणि विशाल कनावजे यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश महापालिका निवडणुकीआधी ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दुसरीकडे पुण्यातही राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पुणे शहर उपप्रमुख सुरज लोखंडे हे आज आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. युती जाहीर झाल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत ठाकरे गटाला दोन मोठे धक्के बसल्याने पक्षातील अस्वस्थता वाढली आहे.

दरम्यान, मनसेलाही धक्का बसला असून, युती जाहीर झालेल्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरचे मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत असून, आगामी काळात आणखी उलथापालथी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!