ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे रणशिंग; प्रमुख वॉर्डमधून दिग्गजांना उमेदवारी

मुंबई वृत्तसंस्था : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपली निवडणूक रणनिती अधिक तीव्र करत उमेदवारांची नावे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या वॉर्डमधून भाजपने युवा, अनुभवी आणि विश्वासू नेत्यांना उमेदवारी देत ताकद दाखवली आहे.

भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांना वॉर्ड क्रमांक 47 मधून उमेदवारी देण्यात आली आहे. माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी वॉर्ड क्रमांक 9 मधून तर माजी नगरसेवक जितेंद्र पटेल वॉर्ड क्रमांक 10 मधून निवडणूक लढवणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन हेही मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून मानखुर्द-शिवाजीनगरच्या प्रभाग क्रमांक 135 मधून ते उमेदवार असतील.

मुंबई महापालिकेसाठी भाजपने सखोल रणनीती आखली असून, वॉर्ड क्रमांक 107 मधून भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. अधिकृत यादी जाहीर होण्यापूर्वीच या प्रमुख उमेदवारांना अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आजच त्यांचे नामनिर्देशन दाखल होणार असल्याची माहिती आहे.

भाजप यंदा मुंबईत एकूण 128 जागांवर निवडणूक लढवत आहे. पक्षांतर्गत बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांची अंतिम यादी शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती. मात्र दादर येथील ‘वसंतस्मृती’ कार्यालयातून पात्र उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोजकेच दिवस उरले असल्याने भाजपने ही खबरदारी घेतली आहे. उमेदवारीवरून नाराजी टाळण्यासाठी संबंधित आमदारांवर कार्यकर्त्यांची समजूत काढण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भाजपकडून जाहीर झालेल्या प्रमुख उमेदवारांमध्ये नील सोमय्या (वॉर्ड 107), तेजिंदर सिंग तिवाना (वॉर्ड 47), नवनाथ बन (वॉर्ड 135), शिवानंद शेट्टी (वॉर्ड 9), संतोष ढाले (वॉर्ड 215), स्नेहल तेंडुलकर (वॉर्ड 218), अजय पाटील (वॉर्ड 214), सन्नी सानप (वॉर्ड 219) आणि तेजस्वी घोसाळकर (वॉर्ड 2) यांचा समावेश आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने आक्रमक पवित्रा घेतल्याने राजकीय वातावरण तापले असून, आगामी दिवसांत प्रचार अधिक वेग घेण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!