ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एक कोटींच्या खंडणीसाठी शेतकऱ्याचं अपहरण करत निर्घृण हत्या !

सिल्लोड वृत्तसंस्था : तालुक्यातील बोदवड येथील शेतकरी तुकाराम गव्हाणे पाटील यांचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करून त्यानंतर निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा सूत्रधार शेतकऱ्याचा परिचितच निघाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. खंडणीचे पैसे न मिळाल्याने आरोपींनी शेतकऱ्याचा खून करून मृतदेह कन्नड घाटातील दरीत फेकून दिला.

या प्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून, त्यात सचिन बनकर या परिचिताचा समावेश आहे. सचिन बनकर (गोळेगाव), अजिनाथ ऊर्फ अजय सपकाळ (पालोद), वैभव रानगोते (गोळेगाव), विशाल खरात (पानवडोद) आणि दीपक जाधव (लिहाखेडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी चार आरोपींना समृद्धी महामार्गावर कारसह अटक करण्यात आली, तर एका संशयिताला लिहाखेडी गावातून ताब्यात घेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम गव्हाणे पाटील शनिवारी सायंकाळी मक्याचे पैसे घेण्यासाठी उंडणगाव येथील व्यापाऱ्याकडे गेले होते. तेथून एक लाख रुपये घेऊन दुचाकीने परतत असताना रात्री सातच्या सुमारास पाचही आरोपींनी कारमधून त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगर परिसरात फिरवत ठेवण्यात आले.

अपहरणानंतर आरोपींनी गव्हाणे पाटील यांच्या मोबाइलवरूनच कुटुंबीयांना फोन करून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र, लोकेशन सतत बदलत असल्याने पोलिसांना अडचणी येत होत्या. अखेर मोबाइल टॉवर डंप डेटाच्या आधारे तपास करत पोलिसांनी आरोपींचे मोबाइल क्रमांक ओळखले आणि त्यांना अटक केली.

दरम्यान, तुकाराम गव्हाणे पाटील घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला होता. दुसऱ्या दिवशी त्यांच्या मुलाला अपहरणकर्त्यांचा फोन आला आणि वडिलांना जिवंत पाहायचे असतील तर एक कोटी रुपये आणण्याची धमकी देण्यात आली. मात्र, त्याआधीच आरोपींनी शेतकऱ्याची हत्या करून मृतदेह दरीत फेकल्याचे उघड झाले.

या घटनेमुळे सिल्लोड परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून, खंडणीसाठी परिचिताच्याच हातून झालेल्या या हत्येने सर्वांनाच हादरवून टाकलं आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!