ध्यास विश्वसार्ह बातमीचा

येरमाळ्यातील शेतकऱ्याची थेट परदेशी झेप; केळी निर्यातीतून सात लाखांचे उत्पन्न

सोलापूर (प्रतिनिधी) येरमाळा परिसरातील प्रगतशील शेतकरी समाधान तानाजी बारकुल यांनी आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि निर्यातक्षम वाणाची निवड करून शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवण्याचा आदर्श घालून दिला आहे. अवघ्या पावणे दोन एकर क्षेत्रात लागवड केलेल्या जी-९ वाणाच्या केळी पिकातून त्यांनी थेट इराक देशात निर्यात करत सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

समाधान बारकुल यांनी पदवी घेतल्यानंतर जल व भूमी व्यवस्थापन विषयात एमएस्सीचे शिक्षण पूर्ण केले. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग थेट शेतीत केला. घरच्या २५ एकर शेतीपैकी पावणे दोन एकर क्षेत्रात जानेवारी महिन्यात सुमारे २००० केळी रोपांची लागवड करण्यात आली. संपूर्ण पिकासाठी सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च झाला. योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर पाणीपुरवठा, रोग व कीड नियंत्रण तसेच निर्यात दर्जानुसार फळांची काळजीपूर्वक हाताळणी यामुळे केळीचे उत्पादन उच्च दर्जाचे झाले.

या लागवडीतून सुमारे ४० टन उत्पादन अपेक्षित असून, त्यातील मोठा हिस्सा इराक देशात निर्यात करण्यात आला आहे. निर्यातीमधून सुमारे सात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, खर्च वजा जाता सुमारे साडेपाच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न शिल्लक राहिले आहे. विशेष म्हणजे निर्यतीनंतरही उर्वरित केळी स्थानिक बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून, त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

इराकमध्ये केळीला चांगला दर्जा व दर मिळत असल्याने समाधान बारकुल यांनी टेंभुर्णी येथील व्यापारी बबन देशमुख यांच्याशी संपर्क साधला. केळीची पाहणी झाल्यानंतर दिल्ली येथील ‘फौजी’ कंपनीमार्फत निर्यातीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. केळी प्रथम टेंभुर्णी येथील कोल्ड स्टोरेजमध्ये साठवून नंतर मुंबई बंदरातून जहाजामार्गे इराकला पाठवण्यात आली.

जी-९ वाणाची केळी आकाराने मोठी, टिकाऊ व निर्यातक्षम असल्याने परदेशी बाजारात मोठी मागणी आहे. योग्य नियोजन आणि बाजारपेठेचा अभ्यास केल्यास शेतकरी थेट निर्यातीशी जोडले जाऊ शकतात, हे समाधान बारकुल यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरातील अनेक शेतकरी केळी लागवड व निर्यातीकडे वळण्यास प्रेरित होत असून, शेतीतून शाश्वत आणि फायदेशीर उत्पन्न मिळवण्याचा नवा मार्ग खुला झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!