मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, प्रचारासोबतच पक्षांतरांचे सत्रही जोरात सुरू आहे. उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेते नाराज होत पक्ष बदलत असल्याचं चित्र दिसत असतानाच, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा राजकीय धक्का बसला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
मुंबई महापालिकेत शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात थेट लढत पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार सुरू असतानाच, कांदिवली पूर्व प्रभाग क्रमांक 28 मधील हनुमान नगर परिसरातून शिंदे गटाला मोठा हादरा बसला आहे. येथील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.
शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांमध्ये महिला शाखासंघटक अश्विनी पवार, उपशाखाप्रमुख भरत पाटील, विनोद गुजर, विजय यादव, गणेश खंदारे, महेश शर्मा आणि सुधाकर पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी ‘मातोश्री’वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश केला. यावेळी विभागप्रमुख संतोष राणे, उपविभागप्रमुख प्रशांत कोकणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या पक्षप्रवेशामुळे ठाकरे गटाचं बळ वाढलं असून, शिंदे गटासाठी ही गंभीर इशाराची घंटा मानली जात आहे. आगामी काळात आणखी नेते आणि पदाधिकारी पक्ष बदलणार का, याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.