पुणे वृत्तसंस्था : महापालिका निवडणुका तोंडावर असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण तापवले आहे. पुणे महानगरपालिकेची निवडणूक रणधुमाळी सुरू असताना भाजपकडून विनाकारण आरोप केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अजित पवार गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी खासदार तथा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर थेट निशाणा साधला.
त्या म्हणाल्या, “राज्य सरकारमध्ये आम्ही महायुतीत आहोत; मात्र महापालिकेसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना वेगवेगळे लढत आहेत. भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडूनच टीकेची सुरुवात झाली. मुरलीधर मोहोळ यांनी जर अजित पवार किंवा आमच्या पक्षावर वक्तव्य केले नसते, तर आम्हालाही उत्तर द्यायची गरज भासली नसती.”
अजित पवारांचा राजकीय अनुभव अधोरेखित करत ठोंबरे पाटील म्हणाल्या, “मुरली अण्णा नगरसेवकावरून खासदार आणि केंद्रीय मंत्री झाले; पण अजित पवार ४० वर्षांपासून राज्याच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यामुळे वडीलधाऱ्या नेत्यांचा आदर राखायला हवा.” गुन्हेगारीविरोधात अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना कायद्याने कठोर आदेश दिल्याचेही त्यांनी नमूद केले.
भाजपवर दुहेरी भूमिकेचा आरोप करत त्या म्हणाल्या, “आमच्यावर आरोप करताना भाजपने आधी स्वतःच्या गिरेबानात पाहिले पाहिजे. राष्ट्रवादीने शिक्षा झालेल्या गुन्हेगारांना तिकीट दिलेले नाही; मात्र भाजपने पळून लावलेल्या उमेदवारांना तिकीट दिल्याबाबत मुरली अण्णा कधी बोलणार?”
रवींद्र चव्हाण आणि प्रवीण दरेकर यांच्यावरही त्यांनी टीका करत, “भाजपाला निवडणूक आली कीच शहाणपण सुचते. समाजात तेढ निर्माण करणे, नको ती प्रकरणे बाहेर काढणे हे भाजपचे राजकारण आहे,” असा आरोप केला. “आधी चौकट तोडली कोणी, हेही लक्षात घ्यायला हवे,” असे सांगत भाजपने सुरू केलेल्या आरोपांना जशास तसे उत्तर दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.