मुंबई वृत्तसंस्था : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर अतिशय गंभीर आरोप करत मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. “महापालिका निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये जाणार असून, त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आधीच ‘डील’ झाली आहे,” असा खळबळजनक दावा सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
सुजात आंबेडकर म्हणाले की, “आमच्या विरोधात उघडपणे भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूला अप्रत्यक्षपणे भाजपच आहे. कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात, हे सर्वांनाच माहिती आहे. आरएसएस जरी निवडणूक लढवत असती तरी त्यांनाही आम्ही हरवलं असतं,” असा टोला त्यांनी लगावला.
यावर अधिक भाष्य करताना त्यांनी दावा केला की, “ऑक्टोबर महिन्यातच प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद अशा तीन महत्त्वाच्या निवडणुका येत आहेत. तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणा.” या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सुजात आंबेडकर पुढे म्हणाले, “निवडणुका संपल्यानंतर प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी त्यांची आणि देवेंद्र फडणवीस यांची ठरलेली डील आहे. भाजपला सत्तेतून खाली खेचायचं असेल, तर वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आहे.”
या आरोपांना बळ देताना त्यांनी काही सामाजिक संदर्भही मांडले. “दोन-तीन महिन्यांपूर्वी सुशीलकुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार, गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस हे तिन्ही प्रमुख पाहुणे होते. यांची नाती फार आतपर्यंत पोहोचलेली आहेत,” असा दावा त्यांनी केला.
“भाजप आणि काँग्रेस बाहेरून EVM आणि रस्त्यावर लढायचं नाटक करतात. पण यांचे व्यवसाय एक, नातीगोती एक, लग्नसंबंध एक आणि धंदेही एकच आहेत. प्रणिती शिंदे भाजपमध्ये गेल्या की पक्षही एकच राहील,” असा गंभीर आरोप करत सुजात आंबेडकर यांनी मतदारांना आवाहन केलं की, “काँग्रेसच्या नादाला लागू नका. काँग्रेसला दिलेलं मत म्हणजे थेट भाजपलाच दिलेलं मत आहे.”
दरम्यान, “मी संपूर्ण महाराष्ट्रातील काँग्रेसबद्दल नाही, तर सोलापूरच्या काँग्रेसबद्दल बोलतोय. सोलापूरच्या खासदार भाजपसाठी काम करतात, हे आता साऱ्या जगाला कळून चुकलं आहे,” असं म्हणत सुजात आंबेडकरांनी आपला आरोप अधिक ठामपणे मांडला आहे.