अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : काँग्रेस पक्षाच्या महिला संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्ष डॉ. सुवर्णा मलगोंडा यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्ष अलका लांबा, जनरल सेक्रेटरी शिल्पा अरोरा तसेच महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे यांनी त्यांना यासंदर्भात निवडीचे अधिकृत पत्र दिले.
डॉ. मलगोंडा या २००६ साली काँग्रेसच्या चिन्हावर थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीत त्या काँग्रेसच्या नगरसेविका म्हणून कार्यरत राहिल्या. नगर परिषदेच्या सभागृहात त्यांनी पक्षनेते म्हणूनही जबाबदारी पार पाडली आहे.
याशिवाय २००८ साली स्वामी समर्थ सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची धुराही त्यांनी यशस्वीरीत्या सांभाळली. यापूर्वी २०१३ ते २०१४ या कालावधीत त्यांनी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडलेली असून संघटनात्मक अनुभवाची भक्कम पार्श्वभूमी त्यांच्याकडे आहे.
निवडीबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. मलगोंडा म्हणाल्या की, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला जाणार आहे. कठीण काळात पक्षाने दिलेल्या या जबाबदारीचे सोने करण्यासाठी पक्षविस्तारावर लक्ष केंद्रित करू, असेही त्यांनी सांगितले.
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसला यश मिळवून देण्यासाठी महिला संघटना सक्रियपणे काम करेल. लवकरच महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात येणार असून स्थानिक पातळीवर कार्यरत, सक्षम व सक्रिय महिलांना संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या निवडीबद्दल सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, महिला प्रदेश कार्यकारिणी सदस्य शाहीन शेख, जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, जिल्हा उपाध्यक्ष अरुण जाधव, तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, ज्येष्ठ नेते अशपाक बळोरगी, ॲड. निवेदिता अरगडे आदींनी डॉ. मलगोंडा यांचे अभिनंदन केले आहे.