मुंबई वृत्तसंस्था : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचाराला वेग आला असून, सर्वच प्रमुख नेते मैदानात उतरले आहेत. प्रत्येक महापालिकेचे राजकीय समीकरण वेगवेगळे असल्याने प्रचाराला विशेष रंग चढला आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत मोठी खेळी करत विरोधकांना जोरदार धक्का दिला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नेरूळ विभागातून शिवसेना ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भाजप आणि काँग्रेसमधील असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे निवडणुकीआधीच शिवसेनेची ताकद लक्षणीयरीत्या वाढली असून, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या पक्षप्रवेशाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, नवी मुंबईतील नेरूळ विभागातील उबाठा गट, मनसे आणि भाजपचे पदाधिकारी तसेच मुंबई शहरातील धारावी विभागातील काँग्रेस व मनसेचे विविध पदाधिकारी आज शिवसेना पक्षात सहभागी झाले आहेत.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये नवी मुंबईतील भाजप उपाध्यक्ष राजू तिकोने, नेरूळचे महामंत्री शशिकांत मोरे, वॉर्ड अध्यक्ष भरत म्हात्रे, भाजप उपाध्यक्ष सोनपा घोलप, उबाठा गटाचे माजी शाखाप्रमुख प्रतापसिंह विसाळ, माजी विभागप्रमुख सुनील हुंडारे, मनसेचे विभाग अध्यक्ष नितीन नायकडे, युवा सचिव ऋषिकेश भुजबळ, तालुका सचिव अक्षय शिरगावकर, वॉर्ड अध्यक्ष सुजित भोर, सागर जोगाडिया, आशिष कदम, गुरुदास गर्जे, अमित पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
या मोठ्या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून सांगितले जात आहे.