ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही; फडणवीसांची मोठी घोषणा

परभणी वृत्तसंस्था : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परभणी दौऱ्यातून लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी व ठोस घोषणा केली आहे. परभणीत आयोजित सभेत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत देवा भाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नाही.”

सभेत उपस्थित असलेल्या हजारो लाडक्या बहिणींना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, भाजपला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर काही लोकांनी लखपती दीदी योजना बंद होईल, अशा अफवा पसरवल्या. मात्र, या योजना बंद झालेल्या नाहीत आणि भविष्यातही बंद होणार नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. “आता केवळ लाडक्या बहिणी ठेवायच्या नाहीत, तर माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दीदी बनवायचं आहे,” असेही ते म्हणाले.

फडणवीस यांनी राज्यातील आकडेवारी मांडताना सांगितले की, महाराष्ट्रात आतापर्यंत 50 लाख लखपती दीदी तयार झाल्या आहेत. त्यापैकी एक लाख लखपती दीदी परभणीतून घडवण्याचे काम मेघना दीदींनी केले असल्याचे त्यांनी नमूद केले. “या वर्षी आपण एक कोटी लखपती दीदींचा टप्पा गाठणार आहोत,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना फडणवीस यांनी महापालिका निवडणुकीकडे लक्ष वेधत सांगितले की, महापौर पदावर बसल्यानंतर एक वर्षाने ते स्वतः परभणीत येऊन आढावा घेणार आहेत. “मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच, पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती बनवले,” असे त्यांनी स्पष्ट केले.

परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना इशाराही देताना फडणवीस म्हणाले, “आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने, परभणीच्या विकासाला जो अडथळा आणेल त्याला नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही.” इतिहास आणि भविष्य याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, इतिहास लक्षात ठेवायचा आणि त्याचा सन्मान करायचा असतो, मात्र आता इतिहासात न राहता भविष्य घडवण्याची वेळ आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!