मुंबई वृत्तसंस्था : आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर महायुतीतील मित्रपक्षांमधील सख्य संपल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. राज्याचे सांस्कृतिक मंत्री आणि भाजप नेते आशिष शेलार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मुद्द्यावरून सडकून टीका करत अत्यंत कडक शब्दांत इशारा दिला आहे. “सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्या बरोबर, नाहीतर तुमच्याविना. आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधातच आम्ही आमचे काम करू,” असे ठणकावून शेलारांनी अजित पवारांना सुनावले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख केल्यानंतर अजित पवारांनी त्यावर टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना आशिष शेलार यांनी भाजपची भूमिका ठामपणे मांडली. “आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो. आम्ही सावरकरांचे भक्त आहोत आणि त्यांच्याच विचारधारेवर ठाम आहोत. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षालाही सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील,” असे शेलार म्हणाले. या वक्तव्यामुळे महापालिका निवडणुकीपूर्वी भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
याचवेळी आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंनाही लक्ष्य करत जोरदार टीका केली. “मुंबईकर महायुतीच्या बाजूने आहेत. राजकारणात अंकगणित आणि रसायनशास्त्र चालत नाही. अनैसर्गिक रसायनशास्त्र असेल आणि गुणधर्म वेगळे असतील तर स्फोट होतो,” असा टोला त्यांनी लगावला. ठाकरे गट आणि मनसेमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला. “एकीकडे आदित्य ठाकरे विरुद्ध उद्धव ठाकरेंना मानणारे, तर दुसरीकडे अमित ठाकरे विरुद्ध राज ठाकरेंची माणसं असा संघर्ष सुरू आहे,” असे शेलार म्हणाले.
दोन्ही भावांच्या पक्षांची स्थिती मोडकळीस आल्याची टीकाही त्यांनी केली. “मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले, संतोष धुरी यांचा प्रश्न सर्वांसमोर आहे. पाटणकर एकनाथ शिंदेंकडे गेले, राऊळ भाजपात आल्या. सगळी अव्यवस्था आणि बेबनाव दोन्ही भावांच्या पक्षांत दिसतो,” असे म्हणत शेलार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.