मुंबई वृत्तसंस्था : राज्यभरात महानगरपालिका निवडणुकांची धामधूम सुरू असताना प्रचारालाही कमालीचा वेग आला आहे. मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये प्रचारासाठी आता अवघे सात दिवस शिल्लक राहिले असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्वच पक्ष ताकदीनिशी मैदानात उतरले असून, सभा, रोड शो, पदयात्रा, कार्नर सभा आणि घरोघरी संपर्क मोहिमा यामुळे शहरांचा कानाकोपरा राजकारणाने व्यापलेला दिसत आहे. अशा निर्णायक टप्प्यावर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून तयार करण्यात आलेले प्रचार गीत राज्य निवडणूक आयोगाने नाकारल्याची माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपने खास प्रचार गीताची निर्मिती केली होती. मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी आणि भावनिक अपील निर्माण करण्यासाठी संगीत, शब्द आणि प्रसिद्ध कलाकारांचा वापर करण्याची रणनीती आखण्यात आली होती. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात हे गीत मोठ्या प्रमाणावर वापरण्याचा भाजपचा मानस होता. मात्र, प्रचाराला गती मिळण्याआधीच निवडणूक आयोगाने या गीतावर आक्षेप घेत त्याच्या वापरास नकार दिला आहे.
या प्रचार गीतामध्ये ‘भगवा’ हा शब्द वापरण्यात आल्याने निवडणूक आयोगाने आचारसंहितेचा हवाला देत आक्षेप नोंदवला आहे. धार्मिक किंवा भावनिक स्वरूपाचे शब्दप्रयोग प्रचारात वापरल्यास मतदारांवर विशिष्ट प्रभाव पडू शकतो, जो निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेला बाधा आणणारा ठरतो, असे आयोगाचे मत आहे. त्यामुळे भाजपला हे गीत प्रचारात वापरण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.
या गीताला विशेष महत्त्व होते, कारण ते प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते आणि सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी गायले होते. मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय कलाकारांचा सहभाग असल्याने हे गीत मतदारांमध्ये सहज पोहोचेल, असा भाजपचा अंदाज होता. विशेषतः मुंबईसारख्या महानगरात नाविन्यपूर्ण प्रचार माध्यमांच्या माध्यमातून वेगळा प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आयोगाच्या निर्णयामुळे भाजपच्या प्रचार रणनीतीला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता स्टार प्रचारकांच्या सभा, रोड शो आणि पदयात्रांचा जोर वाढणार आहे. आरोप-प्रत्यारोपांची धार अधिक तीव्र होण्याची शक्यता असून, विकासकामांच्या मुद्द्यांवर एकीकडे भर दिला जात असताना, दुसरीकडे विरोधकांवर टीकेचे बाण सोडले जात आहेत. प्रचार गीत नाकारले गेले असले तरी भाजपकडून डिजिटल माध्यमे, सोशल मीडिया आणि थेट जनसंपर्काच्या माध्यमातून प्रचाराची धार कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.