पुणे वृत्तसंस्था : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून भाजपचे आमदार महेश लांडगे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना महेश लांडगे यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत पलटवार केला असून, “अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत. आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी,” असा घणाघाती टोला लगावला आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना लांडगे यांनी अजित पवारांवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरूनही जोरदार टीका केली. “स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी अजित पवार भाजपसोबत आले आहेत. त्यांनी आम्हाला भ्रष्टाचार शिकवू नये,” असे म्हणत त्यांनी पवारांवर थेट आरोप केले. तसेच, “माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे असतील, तर मी, पालिका प्रशासन आणि अजितदादा यांनी एकत्र बसावे. मग सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील,” असे आव्हानही लांडगे यांनी दिले.
पुढे बोलताना लांडगे म्हणाले की, “सध्या अजित पवारांचा अहंकार बोलत आहे. ते नैराश्यात आहेत. मुळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत, हे त्यांनी जाहीरपणे मान्य करावे. ते मला पिंपरी-चिंचवडचा आका म्हणतात, पण वास्तव वेगळे आहे.” याचबरोबर त्यांनी अजित पवारांची खिल्ली उडवत, “जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाहीत, ते पिंपरी-चिंचवडचे काय होणार?” असा खोचक सवाल उपस्थित केला.
महेश लांडगे यांच्या या आक्रमक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांच्या फेरीनंतर आता मतदारांचे लक्ष या संघर्षाकडे लागले असून, या वादाचा निवडणूक निकालावर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.