मुंबई वृत्तसंस्था : महापालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत राज्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी मिळताना दिसत आहे. युती-आघाड्यांचे गणित रोज बदलत असून, दोनच दिवसांपूर्वी अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस आणि अकोटमध्ये भाजप-एमआयएम युतीच्या चर्चांनी राज्याचे राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेतृत्वाने या संभाव्य युतींना स्पष्ट नकार दिल्यानंतरही, आता महायुतीतच नवा स्फोट झाल्याचे चित्र समोर आले आहे.
भाजपनंतर आता महायुतीतीलच शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी थेट ऑल इंडिया इत्तेहादूल मुस्लिमीन (AIMIM) सोबत हातमिळवणी केल्याची माहिती समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील परळी नगरपरिषदेत शिंदे गट, अजित पवार गट आणि एमआयएम एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
परळी नगरपरिषद निवडणुकीनंतर गटनेता निवडीदरम्यान हे नवे समीकरण उघड झाले. जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व मित्र पक्षांच्या गटनेतेपदी नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष वैजनाथ सोळंके यांची निवड करण्यात आली. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, अपक्ष आणि एमआयएम असा एकूण २४ सदस्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या गटात एमआयएमच्या नगरसेविका शेख आयशा मोहसीन यांचाही समावेश करण्यात आला आहे.
हीच बाब सध्या वादाच्या केंद्रस्थानी आली आहे. कारण निवडणूक प्रचारादरम्यान एमआयएमच्या सभेत मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर आक्षेपार्ह टीका करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एमआयएमचेच नगरसेवक राष्ट्रवादी-शिवसेनेच्या गटात सामील झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भाजप-काँग्रेस-एमआयएम युतीच्या चर्चांमुळे आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात, आता महायुतीतील घटक पक्षांनीच एमआयएमसोबत हातमिळवणी केल्याने राज्यातील राजकारणात नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर उभ्या राहिलेल्या या विरोधाभासी युतींमुळे मतदार संभ्रमात असून, याचे पडसाद येत्या दिवसांत संपूर्ण राज्यात उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.