नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताची स्टार बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतल्याची अधिकृत पुष्टी केली आहे. गुडघ्याच्या जुन्या आणि गंभीर आजारामुळे आता उच्च स्तरावर स्पर्धा करणे शक्य नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.
सायनाने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये सिंगापूर ओपन स्पर्धेत खेळला होता. मात्र, त्यावेळी तिने निवृत्तीची कोणतीही औपचारिक घोषणा केली नव्हती. नुकत्याच एका पॉडकास्टमध्ये बोलताना सायनाने आपली भूमिका स्पष्ट केली.
ती म्हणाली, “मी दोन वर्षांपूर्वीच खेळणे थांबवले होते. मी माझ्या नियमांनुसार खेळायला सुरुवात केली आणि माझ्याच नियमांनुसार थांबले. त्यामुळे औपचारिक घोषणा करण्याची गरज वाटली नाही.”
सायनाने सांगितले की, तिच्या गुडघ्यांमधील कूर्चा (कार्टिलेज) पूर्णपणे झिजली असून तिला संधिवात (आर्थरायटिस) झाला आहे. “जेव्हा तुम्ही खेळूच शकत नाही, तेव्हा थांबणेच योग्य असते. पूर्वी मी दिवसाला ८–९ तास सराव करू शकत होते, पण आता १–२ तासांतच गुडघ्याला सूज येत असे,” असे तिने नमूद केले.
रिओ ऑलिम्पिक २०१६ दरम्यान झालेल्या गंभीर गुडघ्याच्या दुखापतीनंतर सायनाचे करिअर मोठ्या प्रमाणात प्रभावित झाले. तरीही तिने २०१७ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक आणि २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून शानदार पुनरागमन केले. मात्र, दुखापतीचा त्रास सतत वाढत गेला. २०२४ मध्ये सायनाने सार्वजनिकरित्या आपल्या गुडघ्यांच्या आजाराची माहिती दिली होती.
सायना नेहवाल ही लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकणारी भारताची पहिली बॅडमिंटनपटू ठरली. ती माजी वर्ल्ड नंबर-१ खेळाडू असून तिने तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. सायनाने २०१० आणि २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली आहेत.
२००८ मध्ये तिने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकून आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली. २००९ मध्ये ती BWF सुपर सिरीज जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली. तिच्या योगदानाची दखल घेत तिला २००९ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि २०१० मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सायनाच्या निवृत्तीमुळे भारतीय बॅडमिंटनमधील एक सुवर्णकाळ संपल्याची भावना क्रीडाप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे.