नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात गुरुवारी एक भीषण अपघात झाला. लष्कराचे वाहन सुमारे 400 फूट खोल दरीत कोसळल्याने 10 जवान शहीद झाले असून 11 जवान गंभीर जखमी झाले आहेत. जखमी जवानांना तातडीने एअरलिफ्ट करून उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहनात एकूण 21 जवान होते. हे जवान डोडा येथून वरच्या चौकीकडे जात असताना भद्रवाह-चंबा आंतरराज्यीय महामार्गावर खन्नी टॉपजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन खोल दरीत कोसळले.
या दुर्घटनेनंतर बचाव कार्य तातडीने हाती घेण्यात आले. खराब हवामान आणि दुर्गम परिसरामुळे बचाव कार्यात अडचणी आल्या, मात्र लष्कर व आपत्कालीन यंत्रणांनी समन्वयाने कारवाई केली.
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. “या दुर्दैवी अपघाताने मी अत्यंत व्यथित आहे. या कठीण प्रसंगी संपूर्ण देश शोकाकुल कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,” असे त्यांनी सांगितले. तसेच जखमी जवानांना सर्वोत्तम वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहीद जवानांना लष्कराकडून सन्मानाने श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार असून अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.