नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनावर खोलवर प्रभाव टाकणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. आज २३ जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून याच दिवसापासून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला अधिकृत सुरुवात झाली आहे.
या विशेष प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून एक खास पोस्ट शेअर करत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. या पोस्टमध्ये त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचे दोन छायाचित्रे शेअर करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा गौरव केला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे एक दिग्गज व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. विशेष म्हणजे, हा संपूर्ण संदेश मराठी भाषेतून दिल्यामुळे शिवसैनिकांसह बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्या लाखो समर्थकांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले आहे.
नरेंद्र मोदी यांनी पुढे बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडून सांगताना त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीचा उल्लेख केला. जनतेशी त्यांचे असलेले थेट आणि भावनिक नाते त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरवत होते, असेही मोदी यांनी नमूद केले.
राजकारणाबरोबरच बाळासाहेब ठाकरे यांना कला, साहित्य, संस्कृती आणि पत्रकारितेची विशेष आवड होती, असे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्या व्यंगचित्रकार म्हणून असलेल्या कारकिर्दीचाही विशेष उल्लेख केला. व्यंगचित्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विसंगती आणि राजकीय वास्तवावर निर्भीडपणे भाष्य केले. समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि धारदार शैली हे त्यांच्या व्यंगचित्रांचे वैशिष्ट्य होते.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि निर्भय भूमिकेमुळेच ते सामान्य जनतेचे नेते म्हणून ओळखले गेले, असे नमूद करत महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या विचारांपासून आम्हाला सातत्याने प्रेरणा मिळत असल्याचेही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली पोस्ट देखील पहा…
महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली.
तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते.
महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.