मुंबई : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दावोस दौऱ्यात महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक गुंतवणूक करार झाले असून आतापर्यंत सुमारे ३० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार निश्चित झाले आहेत. येत्या काळात आणखी ७ ते १० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दावोस दौरा अत्यंत यशस्वी ठरला आहे. उद्योग, सेवा आणि कृषी क्षेत्रासह सर्वच क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळाली आहे. यापैकी ८३ टक्के करार थेट परदेशी गुंतवणूक (FDI) स्वरूपातील असून उर्वरित गुंतवणूक आर्थिक संस्था व परदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून येणार आहे. ही केवळ कागदावरची घोषणा नसून पुढील ३ ते ७ वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्ष अंमलात येणारी गुंतवणूक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
१८ देशांतून महाराष्ट्रात गुंतवणूक
महाराष्ट्रात एकूण १८ देशांतून गुंतवणूक येत असून यात अमेरिका, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, स्वीडन, सिंगापूर, नेदरलँड्स, जपान, इटली, यूएई, डेन्मार्क, नॉर्वे, फिनलंड, स्पेन, कॅनडा, बेल्जियम, ऑस्ट्रिया यांचा समावेश आहे. महाराष्ट्राचे कामगिरी देशात सर्वाधिक प्रभावी ठरल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.
अत्याधुनिक क्षेत्रांत मोठी गुंतवणूक
क्वांटम कम्प्युटिंग, एआय डेटा सेंटर्स, एआय टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स, सेमीकंडक्टर फॅब, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्स (GCC), फूड प्रोसेसिंग, रिन्युएबल एनर्जी, ग्रीन स्टील, ई-व्हेईकल्स, अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, शिपबिल्डिंग, शिक्षण, फिनटेक, लॉजिस्टिक्स, टेक्सटाइल्स आणि डिजिटल क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यातील विविध भागांत गुंतवणुकीचा विस्तार
राज्यातील सर्व भागांमध्ये समतोल गुंतवणूक झाल्याचे चित्र असून विदर्भात सुमारे १३ टक्के, तर राज्याच्या इतर भागांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक गुंतवणूक झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, नंदुरबार आणि धुळे येथेही मोठ्या प्रकल्पांची गुंतवणूक झाली आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथे सुमारे ५५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून नागपूर व विदर्भ विभागात २ लाख ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक निश्चित झाली आहे. याशिवाय पुणे, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांमध्येही लक्षणीय गुंतवणूक झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले.