ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठी बातमी : कल्याणनंतर मुंबईतही मनसेचा पाठिंबा हवा : सरनाईक !

मुंबई :वृत्तसंस्था

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केवळ मुंबईवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याणमध्ये आम्हाला पाठिंबा मिळाला, असा दावा मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला. कल्याणमध्ये जसा पाठिंबा दिला गेला, तसाच मुंबईसह राज्यातील इतर महापालिका व जिल्हा परिषदांमध्येही मिळायला हरकत नाही, असे ते म्हणाले.

राज ठाकरे यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच मिळत आला असून आठ वर्षांपूर्वी ठाणे महापालिका निवडणुकीतही मनसेने आम्हाला पाठिंबा दिला होता, अशी आठवण सरनाईक यांनी करून दिली. राज ठाकरे यांच्या भूमिकेशी आम्ही पूर्णपणे सहमत असून त्यांनी अशी भूमिका सातत्याने घेतल्यास महाराष्ट्रातील सर्वच महापालिकांमध्ये चांगले सरकार स्थापन होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपसोबत आमची नैसर्गिक आणि अभेद्य युती असून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र पुढे जात आहोत. आम्ही कुणालाही इशारा देत नाही किंवा कोणाला दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, असेही सरनाईक यांनी स्पष्ट केले.

विकास गोगावले प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितले की, न्यायालयाच्या आदेशानुसार जर कृती करण्यात आली असेल तर त्याचे समर्थन करणे योग्य आहे. न्यायालयाचा आदर राखण्याची भूमिका योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले.

बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेचा तीव्र निषेध करताना सरनाईक म्हणाले की, लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार अत्यंत गंभीर असून मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी या प्रकरणी ठोस भूमिका घेतली आहे. दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्साही सांगितला. वृक्षतोड आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्याच्या घटनांवर बाळासाहेबांचे बारकाईने लक्ष असायचे आणि निसर्ग तसेच हिंदुत्वाचे रक्षण करण्याच्या स्पष्ट सूचना ते देत असत, असे सरनाईक म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!