ठाणे : वृत्तसंस्था
राज्यातील महापालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर अनेक महापालिकांमध्ये महायुतीला स्पष्ट आघाडी मिळाली आहे. ठाणे महानगरपालिकेतही महायुतीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले असून १३१ नगरसेवकांपैकी तब्बल ६९ महिला नगरसेविका निवडून आल्याने महिला प्रतिनिधित्वाचा नवा विक्रम नोंदवला गेला आहे.
दरम्यान, ठाण्यातील मुंब्रा परिसरातून निवडून आलेल्या AIMIM च्या तरुण नगरसेविका सहर शेख यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ‘कैसे हराया…’ असे म्हणत त्यांनी केलेले विजयानंतरचे भाषण चर्चेचा विषय ठरले असून या भाषणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अप्रत्यक्षपणे लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक ३० (मुंब्रा) मधून AIMIM च्या हिजाब परिधान करणाऱ्या नेत्या सहर शेख या नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर दिलेल्या भाषणात त्यांनी, “आम्हाला कोणाच्याही वरदहस्ताची गरज नाही. ज्यांना वाटत होतं की आम्ही त्यांच्यावर अवलंबून आहोत, त्यांच्या अहंकाराला आम्ही मातीमोल केलं आहे. आम्ही कोणाच्या बापाच्या मेहेरबानीवर नाही, तर फक्त अल्लाहवर विश्वास ठेवतो,” असे वक्तव्य केले होते.
याच भाषणात पुढील पाच वर्षांनंतरच्या निवडणुकांचा उल्लेख करत त्यांनी, “मुंब्रा पूर्णपणे हिरवं करायचं आहे आणि विरोधकांना दारुण पराभव स्वीकारायला भाग पाडायचं आहे,” असे विधान केले. ‘कैसे हराया…’ आणि ‘मुंब्रा हिरवं करू’ या उल्लेखामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून काही नागरिकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार व निवेदन देण्यात आल्यानंतर पोलिसांनी नगरसेविका सहर शेख यांना नोटीस बजावली आहे. भविष्यात कोणाच्याही भावना दुखावतील असे वक्तव्य किंवा भाषण करू नये, अशी समज त्यांना देण्यात आली आहे. पोलिसांनी ही कारवाई खबरदारीचा उपाय म्हणून केल्याचे स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे ठाणे महापालिकेच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला असून सहर शेख यांच्या वक्तव्यावर राजकीय व सामाजिक स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.