मुंबई : वृत्तसंस्था
प्रसिद्ध बॉलीवूड कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूझा आणि त्यांची पत्नी लिझेल डिसूझा यांच्याकडून खंडणी वसूल करण्याच्या आरोपाखाली गँगस्टर रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे. तब्बल आठ वर्षांपूर्वी, २०१८ मध्ये पुजारीने रेमो डिसूझा यांच्याकडून ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे.
पाच वर्षांपूर्वी सेनेगलमधून हद्दपार झाल्यानंतर रवी पुजारी तुरुंगात होता. मात्र, या खंडणी प्रकरणात त्याला आतापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुरुवारी, २२ जानेवारी रोजी पुजारीला एस्प्लेनेड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र त्यागीच्या सांगण्यावरून रवी पुजारीने डिसूझा कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सत्येंद्र त्यागीचे नाव यापूर्वीही समोर आले आहे. ऑक्टोबर २०१६ ते फेब्रुवारी २०१८ या कालावधीत रवी पुजारीने रेमो डिसूझा, त्यांची पत्नी आणि मॅनेजर यांना अनेक वेळा फोन करून धमकावले होते.
“डेथ ऑफ अमर” हा चित्रपट लवकर प्रदर्शित करण्यासाठी दबाव टाकत प्रकरण मिटवण्यासाठी ५० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून, खंडणी मागण्यामागील संपूर्ण कट उघडकीस आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.