ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बार्शीत अनैसर्गिक महाआघाडी; भाजपच्या ताकदीपुढे विरोधक घाबरले – जयकुमार गोरे

सोलापूर : वृत्तसंस्था 

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भाजपविरोधात शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राज्याचे मंत्री व भाजप नेते जयकुमार गोरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बार्शीतील ही तथाकथित महाआघाडी अनैसर्गिक असून, केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केलेली तडजोड असल्याचा आरोप त्यांनी केला.

जयकुमार गोरे म्हणाले की, भाजप हा केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. भाजपची वाढती ताकद पाहून विरोधक घाबरले असून, त्यामुळेच दोन-चार नव्हे तर पाच-पाच पक्ष एकत्र येत असल्याचे चित्र दिसत आहे. स्वतःच्या बळावर निवडणूक लढवण्याची क्षमता नसल्यामुळेच विरोधकांना आघाड्यांचा आधार घ्यावा लागत असल्याचा टोला त्यांनी लगावला.

बार्शी तालुक्यात भाजपविरोधात शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना गोरे यांनी महायुतीतील घटक पक्षांनाही सूचक इशारा दिला. स्थानिक पातळीवर आघाड्या करताना काही आचारसंहिता पाळली पाहिजे. महायुतीच्या बाहेर जाऊन निर्णय घेतले जात असतील, तर त्याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. बार्शीत ही युती कशी झाली, कोणाच्या संमतीने झाली, याबाबत संबंधित नेत्यांनाच विचारावे, असे म्हणत त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टोला लगावला.

विरोधकांच्या एकजुटीवर टीका करताना गोरे म्हणाले की, भाजपचा पराभव दोन-चार पक्षांनी एकत्र येऊन करणे शक्य नाही. अशा अनैसर्गिक आघाड्या जनतेला मान्य होणार नाहीत. शेवटी मतदार विकास, स्थैर्य आणि सक्षम नेतृत्वालाच कौल देतील. आगामी सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचाच अध्यक्ष होईल, असा ठाम दावा त्यांनी केला.

दरम्यान, बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणूक ही नेहमीच दोन प्रमुख राजकीय केंद्रबिंदूंभोवती फिरते. आमदार दिलीप सोपल आणि भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यातील लढत यंदाही केंद्रस्थानी राहणार आहे. यंदा दिलीप सोपल यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडी उभी राहिली असून, शिवसेना ठाकरे गट, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा त्यांना पाठिंबा आहे. या महाआघाडीची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली असून, आज सायंकाळी बार्शीत होणाऱ्या निर्धार मेळाव्याकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

दुसरीकडे भाजपकडून राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी सुरू असून, विकास, संघटनात्मक ताकद आणि केंद्र-राज्यातील सत्तेचा लाभ मतदारांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जात आहे. बार्शीतील ही निवडणूक सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारी ठरेल, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!