---Advertisement---

आम्ही भाजपसोबत एनडीएमध्ये एकत्र’; सुनील तटकरे यांचे ठाम वक्तव्य !

By team
On: February 2, 2026 11:36 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

“आज आम्ही एनडीएमध्ये भाजपसोबत सत्तेत आहोत. देशाच्या विकासासाठी आम्ही एकत्र आहोत. भाजपच्या विचारांशी सुसंगत असलेल्यांनी एनडीएमध्ये यायचे असल्यास आपली भूमिका स्पष्ट करावी,” असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. अजित पवार यांच्या नेतृत्वात पक्षाची भूमिका ठरवून निवडणूक लढवली आणि यश मिळवले असून, विलीनीकरणाबाबत शरद पवार गटातील नेते बोलल्यानंतरच आम्ही आमची भूमिका मांडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुनील तटकरे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपचा मित्रपक्ष आहे. भाजपने कधीही आम्हाला कोणता निर्णय घ्यावा, असे सांगितले नाही. आमचे निर्णय आम्हीच घेतो आणि भाजप मित्रपक्ष म्हणून त्या निर्णयांसोबत उभा आहे. प्रफुल्ल पटेल आणि माझी भूमिका वेगळी नाही. शरद पवार यांनीच माझी प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली होती आणि ती जबाबदारी मी यशस्वीपणे पार पाडली. अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी व्हावी, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली असून आमचीही तीच भूमिका असल्याचे तटकरे यांनी सांगितले.

संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना तटकरे म्हणाले की, “राऊत काय म्हणतात, त्याला फारसे महत्त्व नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने अजित पवार यांच्या नेतृत्वात एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आणि राज्यातील जनतेने विधानसभेच्या निवडणुकीत त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे टीका होत राहते, राऊतांची टीका काही वेगळी नाही.”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत बोलताना तटकरे म्हणाले की, शशिकांत शिंदे काय बोलले यावर मी सध्या काही बोलणार नाही. मात्र काही सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार होण्यापूर्वीच चर्चा सुरू केली आहे. विलीनीकरण कुठल्या पक्षाचे कुठल्या पक्षात होणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळाल्यावरच त्यावर बोलता येईल.

विजय वडेट्टीवार यांनी आमच्या पक्षावर बोलण्याआधी चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसचा महापौर निवडून आणावा, असा टोला तटकरे यांनी लगावला. काँग्रेसमध्येच नगरसेवक पळवापळवी करणाऱ्यांनी आमच्या पक्षावर टीका करू नये, असे सांगत त्यांनी महापौर पदाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला. आम्ही अजित पवार यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवून ४१ जागांवर विजय मिळवला असून आमचा पक्ष बळकट आहे. नेता निवडीचा अधिकार हा निवडून आलेल्या आमदारांचाच असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!