---Advertisement---

“धूर नव्हता, पण धोका होता” :अजित पवार विमान दुर्घटनेवर अमोल मिटकरींचा संशय

By team
On: February 2, 2026 1:25 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी झालेल्या भीषण विमान दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता त्यांच्या पक्षातील नेते आमदार अमोल मिटकरी यांनी या घटनेवर गंभीर शंका व्यक्त केल्या आहेत. “धूर नव्हता, पण धोका होता,” असे म्हणत या दुर्घटनेतील शत-प्रतिशत सत्य समोर यावे, अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली आहे. अजितदादांचा 100 टक्के घात झाला असून, आपण शेवटपर्यंत या प्रकरणासाठी लढा देणार, असे ठाम वक्तव्य मिटकरी यांनी केले आहे.

28 जानेवारीच्या सकाळी बारामतीत घडलेल्या या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पिंकी माळी, विदीप जाधव, कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राज्यभर शोककळा पसरली होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तसेच त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची महत्त्वाची बैठकही पार पडली. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया अधिक संवेदनशील मानली जात आहे.

माध्यमांशी बोलताना अमोल मिटकरी म्हणाले की, ही दुर्घटना केवळ अपघात म्हणून दुर्लक्षित करता येणार नाही. ही घटना त्यांच्यासाठी वैयक्तिकरीत्या अपूरणीय हानी असून, ते जिवंत असताना या विषयावर संघर्ष करत राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्या कुटुंबाप्रती आपली निष्ठा कायम राहील, असे सांगत या संपूर्ण मुद्द्यावर आपली सविस्तर भूमिका मे महिन्यात मांडणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले.

दरम्यान, अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळेही या चर्चेला अधिक वेग आला आहे. देवगिरीतील दोन रिकाम्या खुर्च्यांचा उल्लेख करत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. “मी या घटनेचे राजकारण करणार नाही; पण निर्माण झालेल्या शंकांकडे दुर्लक्षही करणार नाही. सवाल विचारणे हे गॉसिप नाही, तर सत्याच्या शोधाची सुरुवात आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

मिटकरी यांनी उपस्थित केलेले प्रश्नही लक्षवेधी ठरत आहेत. दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात असताना केवळ पाच मृतदेह कसे सापडले, हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. सहावा व्यक्ती नेमका कुठे आहे, याबाबत स्पष्टता का नाही, असा सवाल त्यांनी केला. उड्डाणापूर्वी प्रवाशांची डिजिटल यादी उपलब्ध असतानाही त्यामध्ये विसंगती का आढळते, यावरही त्यांनी बोट ठेवले आहे.

याशिवाय, दुर्घटनेनंतर कोणतेही कागद जळालेल्या अवस्थेत का सापडले नाहीत, पायलट वारंवार का बदलले गेले, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. या सर्व बाबी केवळ योगायोग आहेत की त्यामागे काही वेगळे कारण आहे, याचा सखोल तपास व्हावा, अशी त्यांची भूमिका आहे. कोणावरही थेट आरोप न करता, फक्त सत्य समोर यावे, एवढीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!