मुंबई : वृत्तसंस्था
उद्या भूकंप, त्सुनामी किंवा पूर आला तरी संजय राऊत त्याला ‘ऑपरेशन लोटस’चा भाग असल्याचे म्हणतील, असा खोचक टोला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी लगावला. उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातावर पुन्हा संशय व्यक्त केल्यानंतर नवनाथ बन यांनी हे प्रत्युत्तर दिले.
संजय राऊत यांनी अजित पवारांचा विमान अपघात हा ऑपरेशन लोटसचा भाग आहे का, असा सवाल उपस्थित करत भाजपवर गंभीर आरोप केले होते. तसेच भाजपच्या विरोधात जाणारा एकतर तुरुंगात जातो किंवा त्याचा जीव जातो, असा आरोपही त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर नवनाथ बन यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली.
नवनाथ बन म्हणाले, “संजय राऊत प्रत्येक घटनेचा संबंध भाजपशी जोडण्याचा प्रयत्न करतात. उद्या भूकंप झाला तरी तो ऑपरेशन लोटस, त्सुनामी आली तरी ऑपरेशन लोटस आणि पूर आला तरी ऑपरेशन लोटस असेच ते म्हणतील. आरोप करायचे असतील तर किमान काही ठोस पुरावे तरी सादर करावेत,” असे आव्हान त्यांनी दिले.
ते पुढे म्हणाले, “स्वतः शरद पवार यांनी अजित पवारांचा घातपात नसून हा दुर्दैवी अपघात असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. मग संजय राऊत हे शरद पवारांपेक्षा मोठे आहेत का? त्यांच्या वक्तव्याला नेमका काय आधार आहे?” असा सवालही बन यांनी उपस्थित केला.
राऊत यांच्यावर टीका करताना नवनाथ बन म्हणाले, “संजय राऊतांनी खासदारकी आणि राजकारण सोडून स्क्रिप्ट लेखनाचे काम करावे. त्यांनी नेटफ्लिक्ससाठी वेबसीरिज लिहावी. जनतेतून एकदाही निवडून न येता खासदारकी भूषवायची आणि सतत खोटे आरोप करायचे, हेच काम ते करत आहेत.”
अजित पवार स्वगृही परतणार होते, या राऊत यांच्या दाव्यावरही नवनाथ बन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “त्यांच्याकडे याचा काही पुरावा आहे का? अजित पवार स्वगृही परतण्यास इच्छुक नव्हते, उलट काही लोकांना एनडीएमध्ये घेण्याची इच्छा होती का, हे तपासले पाहिजे. राऊत हे सातत्याने खोटी माहिती देत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत भाजपनेच चौकशीची मागणी केली असून सीआयडी तसेच केंद्र सरकारकडूनही चौकशी सुरू असल्याचे नवनाथ बन यांनी स्पष्ट केले. “कोणतीही चौकशी झाली तरी आम्हाला हरकत नाही. हा अपघात दुर्दैवी होता, घातपात नव्हता,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.