---Advertisement---

“विलीनीकरणाच्या चर्चेत फडणवीस नव्हते; मग बोलण्याचा अधिकार कुठून?” : शरद पवारांचा पलटवार

By team
On: February 4, 2026 2:15 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दांत पलटवार केला आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल आनंद व्यक्त करतानाच, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाली होती, त्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस सहभागी नव्हते. मग त्या विषयावर बोलण्याचा त्यांना काय अधिकार, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

बारामती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी भारत–अमेरिका नव्या व्यापार कराराबाबतही सावधगिरीचा इशारा दिला. कराराचा संपूर्ण मसुदा अद्याप सार्वजनिक झालेला नसला, तरी समोर आलेल्या बाबींवरून भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी चिंता निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः अमेरिकेला भारतात कृषी उत्पादनांची निर्यात करण्याची तरतूद असण्याची शक्यता देशातील शेती व्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम करू शकते, असे ते म्हणाले.

केंद्रीय अर्थसंकल्पावर भाष्य करताना पवार म्हणाले की, संसदेत अर्थसंकल्प सादर होताना आपण नेहमी उपस्थित असतो; मात्र अजित पवार यांच्या अपघातामुळे यावेळी दिल्लीला जाता आले नाही. प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहता आले नसले तरी उपलब्ध माहितीनुसार काही बाबी स्पष्ट होतात. सामान्य नागरिकांवर नवीन करांचा बोजा टाकलेला नाही, ही समाधानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.

तथापि, अर्थसंकल्पातून विकासाला अधिक चालना देणाऱ्या ठोस उपाययोजनांची अपेक्षा होती, असे पवार यांनी स्पष्ट केले. केवळ करसवलती किंवा कर न वाढवणे यापलीकडे जाऊन अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अधिक निर्णायक पावले उचलणे गरजेचे होते, मात्र ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

भारत–अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतातून जाणाऱ्या वस्तूंवरील करांमध्ये कपात केल्याचा उल्लेख करताना, त्याबदल्यात कृषी क्षेत्रात अमेरिकेला भारतीय बाजारपेठ खुली होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. अमेरिका हा आर्थिकदृष्ट्या बलाढ्य देश असल्याने त्यांच्या उत्पादनांचा मोठ्या प्रमाणावर प्रवेश झाल्यास स्थानिक उत्पादकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही शरद पवार यांनी दिला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!