---Advertisement---

वडिलांच्या अंतिम क्षणीही परीक्षा दिली; सोलापूरची धनश्री पवार धाडसाची प्रतीक

By team
On: February 22, 2026 9:56 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

सोलापूर शहरात एक प्रेरणादायी घटना घडली आहे, जी मनाला चटका लावणारी आहे. दहावीच्या पहिल्या पेपरसाठी निघालेल्या धनश्री भिकाजी पवार या विद्यार्थिनीला ऐनवेळी आपल्या वडिलांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समजली. तिच्या आयुष्याचा आधार हरपला, पण ती थांबली नाही; तिने आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्धाराने परीक्षा केंद्र गाठून मराठीचा पहिला पेपर दिला.

धनश्री शरदचंद्र पवार शाळेची दहावीची विद्यार्थी असून, शुक्रवारी सकाळी १० वाजता सोलापूरातील भू. म. पुल्ली कन्या शाळेच्या परीक्षा केंद्राकडे जाण्यासाठी निघाली होती. त्या क्षणी रुग्णालयात डायलिसिस घेणाऱ्या तिच्या वडिलांचे निधन झाले. ही बातमी ऐकून धनश्री घरातच रडत बसली होती; तिच्या परीक्षेसाठी मानसिक तयारी नव्हती.

धनश्रीच्या शाळेचे मुख्याध्यापक तानाजी माने यांना ही बातमी कळली. त्यांनी वेळ न गमावता धनश्रीच्या घराकडे धाव घेतले, तिला धीर दिला आणि वर्ष वाया जाऊ न देता परीक्षा देण्याचे प्रोत्साहन दिले. शिक्षकांच्या पाठबळामुळे धनश्री परीक्षा केंद्रावर पोहोचली. येथे केंद्रप्रमुख गीता सादूल यांनीही तिला मोठा धीर दिला.

पेपर दरम्यान धनश्रीला अनेकदा वडिलांच्या आठवणीने हुंदका आला, पण तिने आपले दुःख बाजूला सारत पेपर पूर्ण केला. पेपर देऊन तिने घरी परतताच रडत वडिलांचे अखेरचे दर्शन घेतले. नंतर भिकाजी पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही घटना फक्त एका परीक्षेची नव्हे तर धैर्य, निश्चय आणि कुटुंबातील प्रेमाचीही प्रतिक आहे. धनश्रीने वडिलांचे स्वप्न जपत, अत्यंत कठीण प्रसंगातही आपली जबाबदारी पाळली, ज्यामुळे ती आज अनेकांच्या प्रेरणेचा स्रोत ठरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!