मुंबई,दि.२९ : नवरात्र उत्सवात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतून कोरोना प्रतिबंधासाठीच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, देवी दर्शनाची सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून द्यावी, धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करताना कसल्याही परिस्थितीत गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी आणि मंडपात एकाच वेळी पाचपेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गर्दी नसावी, अशा प्रकारच्या सूचना
राज्य सरकारने नवरात्र महोत्सवासाठी लागू केल्या आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आगामी नवरात्र महोत्सव आणि दसरा सण साधेपणाने साजरा करावा,असे देखील या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळासाठी चार फुटांपर्यंत,घरगुती देवीच्या मूर्तीची उंची दोन फुटापर्यंत असावी असे राज्य सरकारने निश्चित केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील देवीच्या मूर्तीचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही,त्यासाठी महापालिका आणि स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे देखील त्यांनी म्हटले आहे. नवरात्र काळात देवीचे आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत असे या मार्गदर्शक सूचनाच्या माध्यमातून राज्य सरकारने मंडळांना आवाहन केले आहे. या काळात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत, त्याऐवजी आरोग्यविषयक जनजागृतीचे कार्यक्रम आयोजित करून लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, अशा प्रकारचे आवाहन केले आहे.