---Advertisement---

विदर्भावर अन्याय होत असल्याच्या भाजपच्या आरोपावर अजित पवारांचे प्रत्युत्तर

On: March 1, 2021 3:11 PM
Follow Us:
---Advertisement---

 मुंबई: आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. वैधानिक मंडळावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असा प्रश्न माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. ‘अजित दादा तुम्ही विदर्भाच्या जनतेवर अन्याय करत आहात. विदर्भाची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अजित पवारांचा मी निषेध करतो’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

दरम्यान यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याच्या हिश्शाचा एकही रुपया कमी न करता निधीचे संपूर्ण वाटप करण्यात येईल. वैधानिक विकास महामंडळं अस्तित्वात असल्याचं गृहित धरुन निधीवाटपाच्या सूत्रानुसार अर्थसंकल्पात विदर्भ, मराठवाड्याला संपूर्ण निधी दिला जाईल. विदर्भ, मराठवाड्याच्या सर्वंकष विकासासाठी राज्य सरकार कटीबद्ध असून विदर्भ व मराठवाडा वैधानिक विकास महामंडळावरील नियुक्त्या लवकरच करण्यात येतील, असे अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

विधान परिषदेतील बारा आमदारांची नियुक्ती जाहीर होणेही तितकंच महत्वाचे असल्याचे सांगून या मुद्‌याकडेही उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

विधानसभेत उपस्थित एका चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही, उपमुख्यमंत्र्यांनी दिली. विदर्भ, मराठवाडा, कोकण, उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे राज्य सरकारचे ध्येय आहे. त्यासाठी विधान परिषदेसाठी राज्य सरकारने शिफारस केलेल्या सदस्यांच्या नियुक्त्याही तातडीने होणे आवश्यक आहे. विधान परिषदेतील बारा आमदारांच्या नियुक्तीची घोषणाही तातडीने होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!