ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाढत्या कोरोनामुळे अक्कलकोट तालुक्यातही कडक निर्बंध लागू;तहसीलदार मरोड यांची माहिती

मारुती बावडे

अक्कलकोट,दि.२५ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट शहर आणि तालुक्यात देखील यापुढे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच सर्व दुकाने चालू राहणार आहेत तर दर शनिवारी आणि रविवारी हे सर्व दुकाने बंद राहतील,अशी माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वाढत चालला आहे.या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत.त्या उपाययोजनेचा भाग म्हणूनच जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी हे नवे सुधारित आदेश जारी केले आहेत.या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार आणि जनावराचा बाजार बंद राहणार आहे.

खाद्यगृह, परमिट बार सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत कोव्हिडं -१९ च्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करून ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील, होम डिलिव्हरीची सेवा मात्र रात्री दहा वाजेपर्यंत सुरू असेल तसेच सर्व धार्मिक स्थळे सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. धार्मिक विधीमध्ये देखील पाच व्यक्ती पेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिलावासाठी येणाऱ्या कृषी मालाच्या प्रकारानुसार बाजार समितीने नियोजन आराखडा करून एका दिवशी व एकाच वेळेला न करता मालाच्या प्रकारानुसार लिलावाच्या दिवस व वेळा विभागून द्यावेत, जेणेकरून त्यामध्ये गर्दी होणार नाही याची दक्षता घ्यावी.

प्रत्येक शनिवारी आणि रविवारी सर्व दुकाने बंद राहणार आहेत त्यामध्ये हा नियम अत्यावश्यक सेवेमध्ये भाजीपाला,फळे, किराणा,दूध व वृत्तपत्रीय वितरण या बाबींना लागू राहणार नाही,असे देखील मरोड यांनी म्हटले आहे.

हे सर्व नियम अक्कलकोट शहर आणि तालुक्यात लागू करण्यात येत आहेत त्याची अंमलबजावणी प्रभावी करण्याच्या दृष्टीने संबंधिताना सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!