सोलापूर दि. २८ : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून सोलापूर जिल्ह्यातही रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पंढरीतील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मुखदर्शन वेळेत कपात करण्यात आले आहे. भाविकांना केवळ सकाळी ०७ ते संध्याकाळी ०७ वाजेपर्यंत मुखदर्शन घेता येणार आहे.
भाविकांना दर्शनासाठी संकेतस्थळावरुन वेळ निश्चित करावी, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबत सुधारित आदेश जारी केले आहेत. आदेशानुसार मंदिराच्या वेळा देखील निश्चित केले आहेत. येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्याशी चर्चा करून वेळेत बदल केला आहे.
मंदिर सकाळी ०७ वाजता दर्शनासाठी खुले करून सायंकाळी ०७ वाजता दर्शन बंद करण्यात येणार आहे. यापूर्वी सकाळी ०६ ते रात्री १०.०० वाजेपर्यंत दर्शनासाठी परवानगी होती. तसेच भाविकांनी संकेतस्थळावरुन दर्शनाची नोंदणी व कोरोना विषयी नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे जोशी यांनी यावेळी सांगितले.