मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन सोहळा आज दिनांक 31 मार्च 2021 रोजी संध्याकाळी 5.00 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहित उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. भूमिपूजनासाठी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना निमंत्रित करण्यात आलेली नाही. यावरून भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.
भाजप आमदार नितेश राणे आपल्या ट्विटमध्ये असे म्हंटले कि, एमएमआरडीएचे मंत्री म्हणून एकनाथराव शिंदे यांचे नावाचा उल्लेख सुद्धा नाही. आज माननीय बाळासाहेब असते तर पहिल्या आमंत्रण देवेंद्रजी यांना दिले असते, माननीय बाळासाहेब मनाचा राजा माणूस! राजा होण्यासाठी मन मोठं लागतं, त्यांच्यानंतर… फक्त किस्से मोठे आहेत, मन खूप लहान झाली आहेत! अशी टीका भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विटरवरून केली आहे.
आज संध्याकाळी ५.०० वाजता बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले जाणार आहे. दादरच्या शिवाजी पार्कमधील जुना महापौर बंगल्यात हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाचे प्रक्षेपण ऑनलाईन करण्यात येईल, अशी माहिती शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा ठराविक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित राहणार आहेत.