ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात कोरोनाचा मृत्यूदर वाढला,काळजी घ्या,आढावा बैठकीत तहसीलदार मरोड यांचे आवाहन

अक्कलकोट :सध्या अक्कलकोट तालुक्याचा मृत्युदर हा सहा टक्क्यावर गेला असून १५ दिवसात ३५ रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे.नगरपरिषदेने अंत्यविधी करण्यासाठी टेंडर काढले आहे. हे पाहता कोरोनाचे संकट किती भयावह आहे हे दिसून येते.त्यामुळे तालुक्यात जनजागृतीची नितांत गरज आहे. जनजागृतीच्या माध्यमातून कोरोना विरुद्धची लढाई जिंकण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा,
असे आवाहन तहसीलदार अंजली मरोड यांनी केले.

तहसील कार्यालय अक्कलकोट येथे कोरोनाच्या वाढत्या मृत्युदराच्या पार्श्वभूमीवर कोरोना आढावा बैठक आयोजित करण्यात आला होता. या वेळी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते,जिल्हा परिषद सदस्य,लोकप्रतिनिधी व शासकीय पदाधिकारी यांना मार्गदर्शन करताना तहसीलदार अंजली मरोड या बोलत होत्या.

यावेळी मरोड यांनी वार्ड आणि शहराच्या विविध भागात जनजागृती मोहीम राबविण्यासाठी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे सांगून त्या म्हणाल्या, कोरोनाची लक्षणे जाणवताच टेस्ट करून घेणे आवश्यक आहे. टेस्ट केल्यास थोड्याशा उपचारात कोरोना मुक्त होता येते. याचा अनुभव अनेक रुग्णांनी घेतला आहे. परंतु अनेक जण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात दाखल होतात परिणामी मृत्युदर वाढत आहे.सर्दी, ताप, अंगदुखी, डोकेदुखी खोकला, डोळे लाल होणे अशी लक्षणे असून त्वरित उपचार घेतल्यास ऑक्सीजन बेडपर्यंत जाण्याची गरज भासणार नाही. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने स्वामी समर्थ रूग्णालयात ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ती संख्या शंभर पर्यंत नेण्याचा मानस आहे.

सध्या मृत्युदर सहा टक्क्यावर गेला असून १५ दिवसात ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे.नगरपरिषदेने अंत्यविधी करण्यासाठी टेंडर काढले आहे. हे पाहता कोरोनाचे संकट किती भयावह आहे हे दिसून येते.सध्या सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली जात आहे, मात्र लसीकरण सुरळीत होण्यासाठी तीन चार महिने लागणार असल्याचे सांगितले.

यासाठी जनतेने दुखणे अंगावर न काढता उपचारासाठी पुढे यावे असे आवाहन करताना नगरसेवक महेश हिंडोळे यांनी केलेल्या जनजागृती आणि उपचार कामाची प्रशंसा केली.

यावेळी समीर शेख यांनी कोरोना विषयी शंका उपस्थित करून अनेक प्रश्न विचारले त्यावर तहसीलदार अंजली मरोड आणि पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. आणि विषयांतर करू नका असे बजावले.याच बैठकीत ट्रामा सेंटर निर्मितीला विलंब होत असल्याबद्दल विरोधी पक्षनेते अशपाक बळोरगी आणि राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिलीप सिध्दे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संबंधितावर कारवाईची मागणी केली.

यावेळी नगरसेवक बसलींगप्पा खेडगी यांनी जनजागृती मोहिमेला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.यावेळी मुख्याधिकारी सचिन पाटील, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार ,गोपनीय विभागाचे धनराज शिंदे, नगरसेवक महेश हिंडोळे, नगरसेवक आलम कोरबू ,नगरसेवक सद्दाम शेरीकर, जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील , ज्येष्ठ नेते गफूर शेरीकर ,सुरेश सूर्यवंशी ,शिवराज स्वामी, माणिक बिराजदार, समीर शेख, सलीम येळसंगी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!