ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हंजगीत वाढत्या मृत्यू प्रकरणी तहसीलदारांनी घेतली ग्रामस्थांची भेट, टेस्टबाबत ग्रामस्थांचे केले गैरसमज दूर

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या काही दिवसा पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
व मृत्यू प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.या वाढत्या मृत्यू प्रमाणामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.तेव्हा तालुक्याचे तहसीलदार अंजली मरोड, गट विकास अधिकारी महादेव कोळी,तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे आदी प्रशासकीय टीम सध्या ग्रामीण भागात दौरा आयोजित करुन ज्या गावात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यू प्रमाण अधिक झाले आहेत, अशा गावात पोहचून ग्रामस्थांना धीर देताना दिसून येत आहेत.याच गाव भेट दौर्याचे औचित्य साधून तहसीलदार अंजली मरोड व जेऊर चे मंडल अधिकारी सिध्दाराम जमादार यांनी हंजगी गावाला भेट देऊन रात्री उशीरापर्यंत गावात उपस्थित राहुन गावकर्यांना मार्गदर्शन केले.

या वेळी गावपातळीवरील गाव कोरोना समिती सदस्य,सरपंच,उपसरपंच,सदस्य, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर, पोलीस पाटील व प्रतिष्ठित गावकरी आदी उपस्थित होते. या वेळी तहसीलदार अंजली मरोड म्हणाल्या की, ‘गाव करील ते राव काय करील”या उक्ती प्रमाणे सध्या गावात कोरोना गाव समिती काम करणे गरजेचे आहे. गावातील राजकारण,भांडण-तंटे, वादविवाद बाजूला ठेवून सध्या ग्रामस्थांचा जीव वाचविणे जरुरी आहे. यासाठी गावपातळीवरील गाव समिती सक्रीय होऊन काम करणे गरजेचे आहे.एखादा अधिकारी अथवा एखादा कर्मचारी गावपातळीवर येऊन काही करु शकणार नाही.जो पर्यंत गावातील ग्रामस्थ जागृत होऊन गावाच्या रक्षणासाठी पुढे येत नाहीत,तो पर्यंत गाव कोरोना मुक्त होणार नाही. गाव कोरोना मुक्त करायचा असेल तर प्रत्येकांनी गावातील ग्रामस्थांच्या रक्षणासाठी सरसावले पाहिजे.यासाठी गावातील वार्डानुसार ग्रामस्थांची रॅपिड टेस्ट करुन प्रत्येक वार्ड पिंजून काढत कोरोनाला शोधणे गरजेचे असल्याचे सांगितले.

यासाठी तुमच्या गावच्या लोकसंख्या नुसार रॅपिड कीट उपलब्ध करुन देणार असल्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले. गावात निवडणूकीच्या काळात ज्या प्रकारे घरातील प्रत्येक नागरिकांना मतदानासाठी मतदान बूथवर आणून मतदानाची जबाबदारी पार पाडत असतात, त्याच प्रकारे गावातील प्रत्येक वार्डात रॅपिड टेस्ट आयोजित करुन वॉर्डातील प्रत्येक नागरिकांची रॅपिड टेस्ट करुन गाव कोरोना मुक्त करा ,असे आवाहन तहसीलदार अंजली मरोड यांनी गाव कोरोना समितीतील सदस्य व ग्रामस्थांना केले आहे.

सध्या गावात प्रशासक आहे म्हणून ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सदस्यांनी अंग काढून चालणार नाही.आपल्या गावातील ग्रामस्थांचे रक्षण करण्यासाठी व कोरोना महामारीला हरवण्यासाठी गावकर्यांनी एकत्रित येऊन काम करणे गरजेचे असल्याचे सांगितले.आता तहसीलदार अंजली मरोड यांच्या ‘गाव करील ते राव काय करील या मार्गदर्शनाने हंजगीकरामध्ये कितपत बदल होतोय हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!