अक्कलकोट ट्रॉमा केअरसाठी शिष्टमंडळाने घेतली शिंदे यांची भेट, आरोग्यमंत्री टोपे यांना शिंदे यांचे पत्र
अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी शिष्टमंडळाने माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली आणि या विषयावर चर्चा केली. त्यानंतर तातडीने शिंदे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना बैठक लावून हे काम पूर्ण करण्यासंदर्भात पत्र दिले आहे.
कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीमध्ये या ट्रॉमा केअर सेंटरची अक्कलकोट तालुक्याला अतिशय गरज आहे. २०१५ साली हे काम मंजूर आहे पण ते अजूनही हे काम रखडले आहे. २० जून पर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होणार आहे, अशा प्रकारचे लेखी आश्वासन बांधकाम विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
या पार्श्वभूमीवर पुढील म्हणजे नोकर भरती व अन्य यंत्रसामग्री तसेच या संबंधातील उर्वरित कामे हेदेखील लवकरात लवकर पूर्ण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे,गफूर शेरीकर यांच्या शिष्टमंडळाने शिंदे यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली.त्यानंतर तातडीने शिंदे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून याबाबत लक्ष घालण्यास सांगितले आहे.
सध्या या ट्रॉमा केअर सेंटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे पण त्यानंतरची अनेक कामे अजून शिल्लक आहेत.ही कामे देखील लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत लवकरच बैठक होईल आणि या बैठकीमध्ये ही कामे मार्गी लावण्यासाठी आमचा पाठपुरावा राहील,असे बळोरगी यांनी सांगितले.