ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी दिला राजीनामा, आनंदराव सोनकांबळे यांची लागणार वर्णी

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट
पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी मंगळवारी आपल्या
पदाचा राजीनामा दिला आहे. ठरल्या प्रमाणे त्यांची मुदत संपल्याने नवीन सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.दुपारी अडीच वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला.

अक्कलकोट पंचायत समितीमध्ये काँग्रेसची सत्ता आहे.माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वाखाली ही सत्ता असल्याने निवडीचा त्यांना सर्वाधिकार आहे. पंचायत समितीचे सभापती पद हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित आहे.  त्यामुळे सुनंदा गायकवाड यांना सव्वा वर्ष आणि आनंदराव सोनकांबळे यांना सव्वा वर्ष असे सभापतीपद देण्याचे ठरले होते.

दरम्यान सुनंदा गायकवाड यांचे सव्वा वर्ष पूर्ण झाल्याने सोनकांबळे यांनी राजीनाम्यासाठी तगादा लावला होता. पण कोरोना लॉकडाऊन आणि पंढरपूर विधान सभेची पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे गायकवाड यांना फारसे कामकाज करता आले नव्हते. त्यामुळे गायकवाड यांनी थोडा राजीनामा देण्यास विलंब केला. यात माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी ही राजीनामा देण्यासाठी सभापती गायकवाड यांचे पती सिद्धार्थ गायकवाड यांना सूचना केल्या होत्या.त्यांचा शब्द पाळत त्यांनी अखेर राजीनामा दिला आहे.

यावेळी उपसभापती प्रकाश हिप्परगी, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, पंचायत समितीच्या सदस्य अनिता ननवरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. उपसभापतीपदी मात्र प्रकाश हिप्परगी कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.गायकवाड यांनी राजीनामा दिल्यामुळे नव्याने मुगळी गणाचे पंचायत समिती सदस्य आनंदराव सोनकांबळे यांची सभापती पदी वर्णी लागणार आहे. काँग्रेसच्या गोटामध्ये सध्या तेच प्रबळ दावेदार आहेत.त्यांना अजून राहिलेले सात ते आठ महिने काम करण्याची संधी मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!