हातकणंगले : वृत्तसंस्था
देशातील अनेक भागात आज मतदान सुरु असून राज्यातील हातकणंगलेमध्ये 102 वर्षांच्या आजोबांनी मतदान केले आहे. मतदान केंद्रावर गैरसोय असतानाही ते मतदान करण्यासाठी आले. केंद्रावर गैरसोय असतानाही तुम्ही का आलात? असे त्यांना विचारले असता त्यांनी उत्साहात हे तर माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे असे म्हंटले आहे. बाबासो राजाराम यादव असे या आजोबांचे नाव आहे. शिरोली पुलाची या गावातून त्यांनी मतदान केले आहे.
पत्रकारांनी प्रश्न विचारताच ते म्हणाले, ”मतदान करणे हे माझे राष्ट्रीय कर्तव्य आहे. घरी बसूनही मला मतदान करता आले असते. मात्र लोकशाहीसाठी मी इथे आलो आहे. तसेच सध्या मतदानासाठी असलेली व्यवस्था ही अतिशय चांगली आहे. पूर्वी ती व्यवस्था नसायची. आता अपंग, वयोवृद्धांना घरी बसून मतदानाचा हक्क बजावता येतो. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सरकारने राबवलेली ही योजना चांगली आहे”, असे मत या आजोबांनी व्यक्त केला आहे.
आज राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 11 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 7 च्या ठोक्याला मतदानाला सुरुवात झाली. बारामती, कोल्हापूर, माढा, रत्नागिरी -सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, रायगड व हातकणंगले या सर्वच 11 मतदारसंघांत मतदान पार पडत आहे.