मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच दि.२९ रोजी गुरुवारी कल्याणच्या बल्याणी परिसरात आई-वडिलांसोबत उरूसाला आलेल्या एका ३ वर्षीय चिमुकलीचा पाण्याच्या खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. रेहमुनीसा रियाज शहा, असे मृत चिमुकलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत बल्याणी गावात मुंबई-वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम सुरू आहे. या कामादरम्यान अंडरपास मोरी बनवण्याचे काम सुरू आहे. या मोरीजवळ साचलेल्या सांडपाण्यात बुडून रेहमुनीसाचा मृत्यू झाला. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना घडली, असा आरोप चिमुकलीच्या कुटुंबियांनी केला आहे.
खोदलेल्या खड्ड्याजवळ कोणतीही सुरक्षितता न बाळगल्याने ही घटना घडल्याचं रेहमुनिसाच्या आई-वडिलांनी म्हटलं आहे. इतकंच नाही, ठेकेदारावर मनुष्यधाचा गुन्हा दाखल करा, अशी देखील त्यांनी केली आहे. बल्यानी परिसरात पीर वल्ली शहा बाबा यांचा २७ तारखेपासून उरूस सुरू आहे. या उरूसात सहभागी होण्यासाठी मीरा भाईंदर परिसरात राहणारे रियाज शहा हे आपल्या कुटुंबासहित आले होते. पीर बाबाचे दर्शन घेतल्यानंतर शहा हे बल्याणी परिसरात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांकडे थांबले होते. यावेळी त्यांच्या सोबत ३ वर्षाची चिमुकली रेहमूनिसा देखील होती. दरम्यान, खेळता-खेळता रेहमूनिसा घराबाहेर पडली. बराच वेळ होऊनही ती दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. काही वेळाने रेहमुनीसाचा मृतदेह चाळी लगत असलेल्या मुंबई-वडोदरा जेएनपीटी महामार्गाच्या अंडरपास मोरीत साचलेल्या पाण्यात आढळून आला.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. टिटवाळा पोलिसांना देखील या घटनेची माहिती देण्यात आली . याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक पाटील यांच्यासह मयत मुलीच्या कुटुंबीयांनी केली. विशेष बाब म्हणजे, याआधी देखील खड्ड्यात पडून दोन ते तीन मुलं जखमी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. सध्या पोलिसांनी रेहमुनीसाचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.