मुंबई वृत्तसंस्था : एकीकडे शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ऐतिहासिक युतीची घोषणा होऊन राज्यभरात राजकीय चर्चांना उधाण आलं असतानाच, काही तासांतच मनसेला मोठा धक्का बसल्याचं चित्र समोर आलं आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत खांबेकर यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर महापालिकेची निवडणूक 15 जानेवारी रोजी होत असून, प्रचारालाही सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या तोंडावरच मनसेच्या प्रमुख नेत्याने पक्ष सोडल्याने मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतून अनेक नेत्यांनी महायुतीत प्रवेश केला असून, आता या राजकीय गळतीचा फटका मनसेलाही बसत असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना शिंदे गटाने मनसेतून बळकटी साधल्याचं चित्र असून, दुसरीकडे मनसेतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.