ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फायटरने मारहाण केल्याने तिघावर गुन्हा दाखल

सोलापूर : प्रतिनिधी

माझ्याकडे का बघितला, असा जाब विचारत त्रिकूटाने एका तरुणास बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केली. हा प्रकार राजे शिवाजी चौकातील सार्वजनिक रस्त्यावर शनिवारी दुपारी घडला. सुनील अशोक पंगूडवाले असे जखमीचे नाव आहे. याप्रकरणी हर्षल जाधव याच्यासह तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. सोलापुरातील मोरारजी पेठ, मंगळवेढेकर चाळीतील रहिवासी सुनिल अशोक पंगूडवाले (वय ४०), त्यांचे मामा ससाणे यांना भेटून घराकडे जात होते. ते शिवाजी चौकातून जात असताना सार्वजनिक रस्त्यावर थांबलेल्या हर्षल जाधव याने ‘माझ्याकडे का बघतो’ असे म्हटले. त्यावर सुनील पंगुडवाले यांनी त्यास मी तुझ्याकडे बघत नाही, असे सांगितले.

त्यावेळी हर्षल जाधव याने पंगुडवाले यांना थांबवून शिवीगाळ करीत त्यांच्या मोबाईलवरून फोन करून कोणास तरी बोलावून घेतले. त्यांनतर त्या ठिकाणी विक्रांत जाधव आणि एक अनोळखी तरूण बुलेटवरून तेथे आले. त्यांनी सुनीलला शिवीगाळ करून विक्रांत जाधव याने एक लोखंडी फायटर काढले. आज याला खल्लास करतो असे म्हणत, हर्षल जाधव आणि अनोळखी इसमाने सुनीलचे हात पकडले व विक्रांत जाधव याने लोखंडी फायटरने उजव्या डोळयाजवळ मारून गंभीर जखमी केले. त्यात तो चक्कर येऊन खाली पडला. तरीही त्या तिघांनी हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण करून ‘मेला का बघ रे’ असे म्हणून तेथून पळ काढला. याप्रकरणी जखमी सुनील पंगुडवाले याच्या फिर्यादीनुसार फौजदार चावडी पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!