अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट येथील मलगोंडा हॉस्पीटलमध्ये प्रथमच कमांडो ऑपरेशन व फ्लॅप रिकन्स्ट्रक्शनसारखी अत्यंत गुंतागुंतीची व अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. डॉ. प्रथमेश मलगोंडा आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाने ही सात तास चाललेली शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.
रुग्णाच्या तोंडाच्या कॅन्सरचे निदान झाल्यानंतर, डॉ. मलगोंडा यांनी ही शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. उपचाराच्या प्रक्रियेत तोंडातील कॅन्सरग्रस्त भाग आणि जबड्याचे हाड शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आले. त्यानंतर त्या जागी छातीच्या भागातून फ्लॅप घेऊन तो तोंडात ग्राफ्ट करून जोडण्यात आला.
ही शस्त्रक्रिया अत्यंत जिकिरीची असतानाही, डॉ. मलगोंडा आणि त्यांच्या पथकाने ती यशस्वी करून रुग्णाला जीवनदान दिले. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला पाच दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.
ग्रामीण भागात अशा प्रकारची शस्त्रक्रिया प्रथमच मलगोंडा हॉस्पीटलमध्ये पार पडल्यामुळे, ही उपलब्धी येथील आरोग्य सेवेसाठी मैलाचा दगड ठरणारी आहे. यानंतर मलगोंडा हॉस्पीटलमध्ये मेजर व सप्रामेजर शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या जातील, असा विश्वास डॉ. मलगोंडा यांनी व्यक्त केला.