सोलापूर : प्रतिनिधी
राज्यात मराठा उद्योजक घडावेत या उद्देशाने १ लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्तीनिमित्त अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ व लोकमंगल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृती मंदिर येथे मराठा उद्योजक मेळावा आणि लाभार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे, अशी माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख ५ हजार ९३६ लाभार्थी तयार झाले असून, ८८७५ कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी महामंडळाने ८५९ कोटी व्याज परतावा केला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात १० हजार ५० एवढे लाभार्थी झाले असून, ८०३ कोटी रुपये विविध बँकांनी कर्ज वितरित केले आहे. त्यापैकी महामंडळाने ७८ कोटींपेक्षा जास्त व्याज परतावा केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मंत्र्यांबरोबर शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका व सहकारी बँकांचे प्रमुख, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, अधिकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, लाभार्थी यांचे तसेच अन्य संबंधितांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त केले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रात १ लाखापेक्षा जास्त मराठा उद्योजक संख्या पूर्ण झाली. जिल्ह्यातील सर्व मराठा बांधव व मराठा उद्योजक यांच्यापर्यंत ही योजना पोहोचावी या उद्देशातून हा मेळावा आयोजित केला आहे. महामंडळाच्या माध्यमातून आता यापुढे पाच लाखांचा टप्पा पार पाडायचा असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस अनंत जाधव, अर्जुन चव्हाण, शिवाजी मोरे, स्वानंद कोडुरीकर आदी उपस्थित होते.