वर्धा : वृत्तसंस्था
अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असताना आता सेलूकाटे परिसरावर काळाने झडप घालून एका सुखी कुटुंबाचा संसारच उद्ध्वस्त केल्याची हृदय पिळवटून टाकणारी घटना सोमवारी रात्री घडली. वर्धा-सेलूकाटे मार्गावर नवोदय विद्यालयाजवळ भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने पती-पत्नी व त्यांच्या अल्पवयीन मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर आणखी एक 6 वर्षीय मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृतांमध्ये सेलूकाटेतील भोयर कुटुंबाचा समावेश आहे. या दुर्घटनेत सोमनाथ भोयर (वय 38), निकिता सोमनाथ भोयर (वय 32) आणि मुलगा पूरब (वय 12) यांचा जागीच मृत्यू झाला. तर लहान मुलगा कान्हा (वय 6) गंभीर जखमी असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, भोयर कुटुंब वर्धा गणेशनगर येथील एका कार्यक्रमावरून रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून आपल्या सेलूकाटे येथील घरी परतत होते. याचदरम्यान वायगाव येथील एक चारचाकी वाहन भरधाव वेगाने येऊन त्यांच्या दुचाकीवर आदळले. धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे अक्षरशः तुकडे तुकडे झाले होते.
धडक दिल्यानंतर चारचाकीचालक घटनास्थळावरून फरार झाल्याची माहिती असून वाहन वायगाव येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. जखमी मुलगा कान्हाला नागरिकांनी तातडीने सावंगी रुग्णालयात हलविले. मात्र उर्वरित कुटुंबीयांना वाचवण्याचे नागरिकांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले. सेलू आणि काटे परिसरात या घटनेने शोककळा पसरली असून गावात एकच हळहळ व्यक्त होत आहे. अचानक एका कुटुंबाचा आवाज कायमचा थांबला अशी खंत व्यक्त होत आहे.