अक्कलकोट, तालुका प्रतिनिधी : शहरातील मुजावर गल्ली येथे ३ जानेवारी २०२६ रोजी चंदू हिबारे यांच्या घरात अचानक शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत घरातील अन्नधान्य, रोख रक्कम, लाकडी वस्तू, स्वयंपाकाची भांडी व इतर मौल्यवान साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. या दुर्घटनेत घरातील सर्व सामानाचे मोठे नुकसान झाले असून कुटुंबीय अक्षरशः उघड्यावर आले आहेत.
दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास परिसरातील नागरिकांना अचानक घरातून धूर निघताना दिसून आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नागरिकांनी तातडीने धाव घेतली. जवळील पाण्याच्या टाक्यांमधून पाणी आणत जीवावर उदार होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्या ॲड. फारिया टिनवाला यांनी त्वरित अग्निशमन दलाशी संपर्क साधून मदत मागवली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, मात्र तोपर्यंत घरातील बहुतांश साहित्य जळून नष्ट झाले होते.
या प्रसंगी कैफ रजाक तांबोळी, अमोल खराडे, इक्बाल टिनवाला, इम्रान फुलारी, रेहान अरब, अस्लम बोरोटी, नवाज डांगे आदींनी आग विझविण्यास मोलाची मदत केली. दरम्यान, या आगीत पीडित झालेल्या हिबारे कुटुंबाला प्रशासनाने तातडीची आर्थिक व अन्य स्वरूपाची मदत करावी, अशी मागणी ॲड. फारिया टिनवाला यांनी केली आहे.