जालना : वृत्तसंस्था
पुण्याकडून यवतमाळच्या दिशेने २७ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसला (MH-29 AW 4444) आज पहाटे सुमारे तीन वाजता भीषण आग लागली. जालना–छत्रपती संभाजीनगर मार्गावरील बदनापूर तालुक्यातील शेळगाव येथील पेट्रोल पंपासमोर ही धक्कादायक घटना घडली. बसचे टायर फुटल्याने लागलेल्या या आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली; मात्र पोलिसांच्या तत्परतेमुळे सर्व २७ प्रवासी सुखरूप बचावले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस काल रात्री पुण्यातून प्रवाशांना घेऊन रवाना झाली होती. पहाटे तीनच्या सुमारास शेळगाव परिसरात अचानक बसचे टायर फुटले. चालकाने प्रसंगावधान राखत बस थांबवली; मात्र टायरच्या घर्षणामुळे क्षणार्धात बसने पेट घेतला. त्या वेळी बसमधील बहुतांश प्रवासी गाढ झोपेत असल्याने एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती ‘डायल ११२’ द्वारे मिळताच बदनापूर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जैस्वाल आणि पोलिस कॉन्स्टेबल अब्दुल बारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कॉन्स्टेबल अब्दुल बारी यांनी त्वरित अग्निशामक दलाला पाचारण केले. आगीने रौद्र रूप धारण केले असतानाही पोलिसांनी जीवाची पर्वा न करता बसमध्ये अडकलेल्या व झोपेत असलेल्या सर्व २७ प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पोहोचेपर्यंत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली होती. काही वेळातच बस पूर्णतः जळून खाक झाली आणि केवळ सांगाडा शिल्लक राहिला. पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप केला नसता, तर मोठी जीवितहानी झाली असती, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
प्रवाशांना सुखरूप बाहेर काढल्यानंतर त्यांच्या राहण्याची तसेच पुढील प्रवासाची व्यवस्था स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली होती.