मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज सर्वात मोठा निकाल लागणार आहे. त्यापूर्वी दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप देखील होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये मंगळवारी मध्यरात्री महत्वाची बैठक झाल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीत तिन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याचं कळतंय.
या बैठकीला राज्याच्या नवीन पोलीस महासंचालक रश्मी शुल्का देखील उपस्थित होत्या. आज शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येणार असल्याने राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे.
दोन्ही गटांमध्ये संघर्ष उफाळू नये, यासाठी काळजी घेतली जाणार आहे. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारकडून काही महत्वाच्या सूचना देखील देण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज ऐतिहासिक निकालाचं वाचन करणार आहेत.
ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाच्या १६ आमदारांविरोदात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. तर शिंदे गटाकडून ठाकरेंच्या १४ आमदारांना अपात्र करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे यांचा समावेश नाही. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या ठाकरे गटाच्या आमदार ऋतुजा लटके यांच्याविरोधात सुद्धा याचिका दाखल करण्यात आली नाही.