ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अल्पवयीन मुलाने दिली खुन्नस अन सात जणांनी केला कोयत्याने वार !

पुणे : वृत्तसंस्था

’तू आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले,’ असे म्हणत एका अल्पवयीन मुलासह सात जणांनी कोयत्याने वार करून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलास गंभीर जखमी केले. कारेगाव (ता. शिरूर) येथील प्लेस्टोअर सोसायटीसमोर ही घटना घडली. या प्रकरणातील 7 आरोपींच्या रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी 24 तासांच्या आत मुसक्या आवळल्या, तर गुन्ह्यात सहभागी असलेल्या अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली.

शंकर करंजकर (वय 19), ओम चव्हाण (वय 18), रोहन बोटे (वय 18), ओंकार देशमुख (वय 18), गिरीश कराळे (वय 20), गोरख मोरे (वय 22), हर्षल पारवे (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी यश धनवटे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ’तू आमचा मित्र ओंकारला खुन्नस देत का बघितले? तुला माहिती आहे का, ओंकार कोण आहे, थांब तुला जिवंतच सोडत नाही,’ असे म्हणत एका अल्पवयीन मुलासह सात जणांनी अल्पवयीन मुलाच्या पोटात, डोक्यात, पाठीत कोयत्याने वार करून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलास गंभीर जखमी केले. तसेच अन्य संशयित आरोपींनी हाताने मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून अल्पवयीन मुलास जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. त्यानुसार शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपासाच्या सूचना दिल्या.

तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील आरोपी हे केज (जि. बीड) हद्दीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण व तपास पथकाने केज पोलिसांच्या मदतीने सर्व संशयित आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना शिरूर न्यायालयात हजर केले असता त्यांना दि. 29 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली, तर गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!