सायकलवरून ‘गावगाथा’चा सुगंध पसरवणारा एक अवलिया – धोंडपा नंदे
वाचन, पर्यावरण आणि मातीतल्या माणसांचा खरा दूत!
पुणे : वृत्तसंस्था
पुण्याच्या गर्दीच्या रस्त्यांवर, मोटारींचा आवाज आणि धावपळीच्या जीवनात एक माणूस मात्र शांतपणे सायकलवरून पुढे सरकतो त्याच्या हातात दोन दिवाळी अंक, ‘गावगाथा’चे! आणि त्या अंकांबरोबर तो पोचवतो एक सुगंध… गावाच्या मातीतला, माणुसकीचा आणि वाचनसंस्कृतीचा. हा प्रवास आहे सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावचे सुपुत्र धोंडपा नंदे यांचा जीवनातल्या संघर्षातून उभं राहिलेलं हे नाव आज प्रेरणादायी ठरलं आहे.सन १९९७ मध्ये परिस्थितीशी झुंज देत शिक्षणासाठी पुण्यात आले.
काम, शिक्षण, जबाबदाऱ्या — सगळं सायकलवरूनच!त्या काळात सुरू झालेला सायकल प्रवास आजही कायम आहे.२८ वर्षांचा सायकल प्रवास म्हणजे एक सवय नाही, ती एक जीवनशैली झाली आहे.त्यांचं सायकलवरचं प्रत्येक पेडल म्हणजे एक संदेश —“पर्यावरण जपा, आरोग्य जपा आणि वाचन वाढवा.”
गेल्या २५ वर्षांपासून मुक्त पत्रकार म्हणून लेखणी हातात घेतलेली ही व्यक्ती आजही समाजातील प्रश्न, प्रेरणादायी कथा आणि लोकजीवन यावर सातत्याने लिहिते.शब्दांमधून लोकांना विचार करायला लावणं आणि कृतीतून प्रेरणा देणं — हेच त्यांचं ब्रीद गेल्या चार वर्षांपासून ते स्वतः संपादन करतात ‘गावगाथा दिवाळी अंक’गावातील लोकजीवन, परंपरा, संस्कृती, आणि बदलाचं दर्शन घडवणारा सुंदर लेखसंग्रह.पण या अंकाचं खरं वैशिष्ट्य म्हणजे —ते हे अंक स्वतः सायकलवरून पुण्यातील पुस्तक विक्रेत्यांपर्यंत आणि वाचकांच्या हातात पोचवतात!
ना दिखावा, ना प्रसाराचा गाजावाजा फक्त वाचनाची ओढ आणि मराठी संस्कृतीप्रती असलेलं जिव्हाळ्याचं प्रेम. त्यांच्या सायकलसोबत फिरते एक आशा की अजूनही या जगात काही लोक “वाचन” हा उत्सव मानतात, “शब्द” हा त्यांचा धर्म आहे, आणि “गाव” ही त्यांची ओळख आहे. धोंडपा नंदे हे खऱ्या अर्थाने साहित्याचे सायकलस्वार, वाचनसंस्कृतीचे वाहक, आणि मातीशी नातं जोडलेला अवलिया!त्यांचा प्रवास हे दाखवतो की—
जर मनात निष्ठा असेल, तर सायकलवरूनही संस्कृती पोचवता येते. गावगाथा दिवाळी अंक — ग्रामीण भावनांचा, संस्कृतीचा आणि प्रेरणेचा ठेवा सायकलवरून सुरु झालेला हा प्रवास आज ‘वाचनाचा महोत्सव’ बनला आहे संपर्क : ९८५०६१९७२४