ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उत्तर भारतात पसरली धुक्याची चादर

नवी दिल्ली: वृत्तसंस्था

उत्तर भारतात धुक्याची चादर पसरल्याने दृष्यमानतेत रविवारी मोठी घट झाली. उत्तरेकडील काही क्षेत्रात तर दृष्यमानता शून्य मीटरपर्यंत खाली आली होती. त्यामुळे विमान वाहतुकीसोबतच रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. दृष्यमानता घटल्याने दिल्ली विमानतळावर येणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय फ्लाईटसह १० फ्लाईट इतर ठिकाणी वळवण्यात आल्या, तर १०० हून अधिक फ्लाईट्सना उड्डाण करण्यास उशीर झाल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

धुक्यामुळे दृष्यमानता घटल्याने अपघात होण्याचा धोका असतो. त्यामुळे अनावश्यक प्रवास टाळण्याचा व वाहन चालवताना खबरदारी घेण्याचा सल्ला भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे. धुक्यामुळे दिल्लीकडे येणाऱ्या २२ रेल्वे प्रभावित झाल्यानंतर जवळपास १०० हून अधिक फ्लाईट्सना उड्डाण करण्यास उशीर झाला. उपग्रहाद्वारे प्राप्त छायाचित्रांमध्ये धुक्याचा थर दिसत असून, तो पंजाबपासून ईशान्य राजस्थानपर्यंत पसरला आहे. पूर्वेकडील किनाऱ्यावरदेखील काही ठिकाणी दाट धुके पसरल्याचे दिसत आहे. शनिवारी रात्री १० वाजल्यापासून पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर राजस्थान व उत्तर प्रदेशात धुके पसरल्याचे आयएमडीच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. यंदाच्या हिवाळ्यात प्रथमच अमृतसरच्या डिब्रूगडपर्यंत गंगानगर, पटियाला, अंबाला, चंदीगड, दिल्ली, बरेली, लखनौ, बहराईच, वाराणसी, प्रयागराज व तेजपूरमध्ये (आसाम) दृष्यमानता शून्य मीटरपर्यंत नोंदवण्यात आली.

चालू मोसमातील हे सर्वाधिक दाट धुके असून त्याचा कालावधीदेखील सर्वात मोठा असल्याचा दावा हवामान विभागाने केला आहे. त्यामुळे महामार्गावरून वाहन चालवताना काळजी घेण्यासोबत ‘फॉग लाईट’चा वापर करण्याची विनंती हवामान विभागाने प्रवाशांना केली आहे. दुसरीकडे, जम्मू-काश्मिरात थंडीची लाट पसरली असून, तापामानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे श्रीनगर शहरात शनिवारी रात्री तपामानात मोठी घट झाल्याने ते उणे शून्य ते ४.२ अंश सेल्सियस नोंदवण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!