ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आ.सुरेश धस संतापले : वाल्मीक कराडलाही ‘मकोका’ लावा

बीड : वृत्तसंस्था

राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सात आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. मात्र उरलेल्या आठव्या आरोपीला सुद्धा मकोका लावला पाहिजे. त्याच्यावर देखील 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या हत्येमध्ये आका सुद्धा आहे. तोच मेन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धस बोलत होते.

या प्रकरणातील वरच्या आकाने 19 ऑक्टोंबर रोजी स्वतःच्या सातपुडा या बंगल्यावर बैठक घेतली. त्यामुळे तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धस यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख यांची हत्या केवळ दीड कोटी रुपयांसाठी केली गेली. दीड कोटी नाही तर आम्ही तीन कोटी गोळा करून तुम्हाला दिले असते. मात्र आमच्या माणसाला अशा पद्धतीने तुम्ही मारायला नको होते, असे देखील धस यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात कोणत्याही प्रकारचा जातिवाद केला जात नसल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.

आज 7 जणांना मकोका लागला. एकाला बाजूला ठेवण्यात आले आहे. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला पाहिजे. आका सध्या आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करत असेल, पण तोच मुख्य आहे. वरच्या आकानेही 19 ऑक्टोबरला आपल्या सरकारी सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली होती. ही बैठक घेणारा मंत्री या प्रकरणात आरोपी कसा नाही? हे मला पोलिसांनी समजावून सांगावे, असे सुरेश धस म्हणाले. अॅट्रोसिटी दाखल करू नका म्हणून आकाने पोलिसांना फोन केला होता. त्यानंतर आका त्याच्या आकाशी बोलला असेल. तर आकाही या प्रकरणात आरोपी होतील. या दोघांनाही बिनभाड्याच्या खोलीत टाकले पाहिजे. यांना जिल्ह्याच्या गरम बराकीत जाऊ द्या, अशी माझी पोलिसांना विनंती आहे. या लोकांनी बाहेर कितीही टारटूर केली तरी या गरम बराकीत गेले की देव आठवतात, असेही सुरेश धस म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!